पैसा व देणगी देणे म्हणजे समाज कार्य होत नाही. त्यांच्यात जाऊन त्यांच्यासाठी कार्य करणेदेखील समाजकार्य आहे. मानव्य संस्थेच्या विजयाताई लवाटे यांनीदेखील मध्यमवर्गात जाऊन काम केले. मध्यमवर्गाने आपल्या कार्यक्षेत्रात राहून वंचितांसाठी कार्य करावे असे, आवाहनही ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. हेरंब कुलकर्णी यांनी केले.
‘मानव्य संस्थे’च्या संस्थापिका विजयाताई लवाटे यांच्या 19 व्या स्मृतिदिनानिमित्त ‘विजया लवाटे फेलोशिप’चा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी डॉ. कुलकर्णी बोलत होते. ‘मानव्य संस्थे’चे अध्यक्ष शिरीष लवाटे, संजीव देव, अरुंधती देसाई, अभिषेक आकोटकर यावेळी उपस्थित होते.‘मैत्री मनाची ओळख शरीराची’ या लैगिक शिक्षणावरआधारीत पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, आत्मकेंद्रीपणामुळेच मध्यमवर्गातील लोक समाजातील वंचित घटकांसाठी सामाजिक काम करणे विसरले आहेत.
पूर्वी मध्यमवर्ग समाजाच्या प्रश्नांविषयी जागृत होता. वंचित घटकांचा विकास व्हावा यासाठी मध्यवर्गाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विजया लवाटे यांनी समाजातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य मध्यवर्गाने डोळ्यासमोर ठेवले होते. मध्यवर्गातील व्यक्ती समाजासाठी कार्य करू शकते याचे उत्तम उदाहरण विजया लवाटे यांनी समाजासमोर ठेवले आहे. लवाटे यांनी साने गुरूंजींचे विचारानुसारच सामाजिक कार्य केले आहे. आज साने गुरूजी असते तर त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी कार्य केले असते असेही, कुलकर्णी म्हणाले.
शिरीष लवाटे म्हणाले, लैंगिक शिक्षणाविषयी जागृती झाल्याने पूर्वीच्या तुलनेत आता आईपासून मुलांना होणार एचाआयव्हीचा संसर्ग कमी झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थांची मानसिकता बदलण्यासाठी आणि त्यांना सर्व विषयांची माहिती मिळावी यासाठी शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करता येईल का? याचा विचार होणे गरजेचे आहे. कार्यक्रमानंतर अभिनेते संदीप पाठक यांनी ‘वर्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाचे सादरीकरण केले. ‘मानव्य संस्थेच्या विश्वस्त विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.