Breaking News

‘गेला माधव कुणीकडे’ नाटक पुन्हा येणार रंगभूमीवर! ; पहा कोण कोण आहे यात

‘अरे हाय काय अन् नाय काय’ असं म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. या दोघांच्या अफलातून टायमिंगवर पब्लिक फुल टू फिदा झालं. या नाटकातील प्रशांत दामले यांचा ‘अरे हाय काय अन् नाय काय’ हा डायलॉग आजही चांगलाच पॉप्युलर आहे. या नाटकाची लोकप्रियता वाढतच गेली. 7 डिसेंबर 1992 ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर 1802 प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्षे या नाटकानं ‘ब्रेक’ घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा शुभारंभ 15 जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी 4.00 वा. होणार आहे.

वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाची संहिताच धमाकेदार होती. दोन कलावंत आपापल्या भूमिका घेऊन अभिनयाची जी जुगलबंदी पेश करायचे त्याला तोड नाही. दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल रसिकांना हास्याची मेजवानी देणारी असायची. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत.

रसिकांना हसवण्याचं आपलं कर्तव्य चोख बजावत रंगभूमी हीच कर्मभूमी मानत एकापेक्षा एक सरस नाटकं देणाऱ्या प्रशांत दामले यांनी पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणत रसिकांना मनोरंजनाची अफलातून ट्रीट दिली आहे. काही नाटकांना रसिकांचं अफाट प्रेम लाभतं. ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक त्यापैकीच एक…मायबाप रसिकांसाठी’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणताना अतिशय आनंद होत असल्याचं अभिनेता प्रशांत दामले यांनी सांगितलं.