आग्र्यातील प्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवू, असा धमकीचा ई-मेल पर्यटन विभागाला मिळाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली. यामुळे बॉम्ब निकामी पथक ताजमहल परिसरात दाखल झाले. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. तसेच आग्रा पोलिसांकडून हा ईमेल कोणाकडून प्राप्त झाला, याची चौकशी सध्या सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
आज दुपारी ३ च्या सुमारास पर्यटन विभागाच्या अधिकृत मेलवर एक ई-मेल प्राप्त झाला. यात ताजमहालच्या आत बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवला असून या बॉम्बच्या स्फोटाची वेळ सकाळी नऊ वाजता निश्चित करण्यात आली आहे. हा स्फोट थांबवणं शक्य असेल तर थांबवा, असा संदेश या ईमेलमध्ये देण्यात आला होता. या धमकीचा मेल वाचताच पर्यटन विभागाने तात्काळ आग्रा पोलिसांना याची माहिती दिली. तसेच स्थानिक पोलीस, सीआयएसएफ आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनाही याबद्दल कळवण्यात आले.
यानंतर पोलिसांनी तात्काळ परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. तसेच ताजमहाल परिसरात बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथक दाखल झाले. या धमकीनंतर पर्यटकांमध्ये कोणतीही दहशत निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. तसेच परिसराची तपासणीही सुरु आहे. या धमकीनंतर पोलिसांनी ताजगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
ताजमहाल सुरक्षा एसपी सय्यद अरीब अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटन विभागाला एक ईमेल मिळाला होता. या आधारे ताजगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीनंतर ताजमहालची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत आणि कडेकोट करण्यात आली आहे. त्याचबरोबर बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकही दाखल झाले. सध्या परिसराची तपासणी करण्यात आली आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.