Breaking News

“कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची ही शासन पुरस्कृत थट्टा आहे” ; अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणी खा. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरे पोलिसांच्या व्हॅन मधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसाची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला. यात आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला.

सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं आहे?

महायुती सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळले आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात उशीर करण्यात आला. लोकांच्या प्रचंड दबावानंतर एफ आय आर दाखल करण्यात आली खरी पण आता आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची ही शासन पुरस्कृत थट्टा आहे.

बदलापूरमध्ये नेमकी काय घटना घडली?

बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूर मध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.