एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरुन एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन आले. तसेच, विविध देशातून फोन येत असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर एकनाथ खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या धमकीचे कारण अद्याप समोर आलेला नाही. पूर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत असणारे एकनाथ खडसे हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनीच भाजपामध्ये जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी, “माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, पण आता मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकनाथ खडसे स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.