Breaking News

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांस जबर शासन होण्यासाठी सुसंगत असा कडक कायदा करावा – उदयनराजे भोसले

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांस जबर शासन होण्यासाठी सुसंगत असा कडक कायदा करावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांना समक्ष भेटून त्यांनी ही मागणी केली आहे. याचबरोबर, ऐतिहासिक चित्रफित किंवा चित्रपटांचे सेन्सॉर बोर्डाने परवानगी देताना इतिहासतज्ञांच्या कमिटीची प्रथम मान्यता घेण्याचे बंधन घालावे आदी मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या आहेत.

अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांच्या बाबतीत अवमानजनक वक्तव्ये केली गेली त्यामधून समाजिक तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यासबंधी कायदेतज्ञांची मदत घेऊन अश्या घटना घडू नयेत व महापुरुषांच्या बाबतीत अवमानजनक वक्तव्य केल्यास कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा संसदेत पारीत करावा. ऐतिहासिक चित्रपटांच्या माध्यमातून अनेक वेळा इतिहासाची मोडतोड करून मांडणी केली जाते असल्याचे अनेक वेळा इतिहास तज्ज्ञांनी आमच्या निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसावा व नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या घटना दाखवण्यास प्रतिबंध व्हावा जेणेकरूण समाजामध्ये दुफळी निर्माण होऊ नये व सामाजिक सलोख्यास धक्का लागू नये म्हणून ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांसाठी नियंत्रण ठेवणारी सेन्सॉर कमिटी स्थापन करावी, केंद्राने अधिकृत ठरविलेला इतिहासच शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये प्रसिध्द होईल, ज्यामुळे इथून पुढे असे शालेय पाठ्यपुस्तकात चुकीचा इतिहास छापल्याने वादविवाद होणार नाहीत अशी आग्रही मागणीदेखील अमित शहा यांच्याकडे यावेळी केली.

दरम्यान, केंद्रीय पर्यटन मंत्र्याची भेट घेऊन स्वदेश योजने अंतर्गत बुदध सर्किट, रामायण सर्किट यासांरखी सर्किट विकसित केली जात असलेने याच धर्तीवर शिवस्वराज्य सर्किट विकसित केले जावे अशी मागणी आम्ही नुकतीच केली आहे, याकामी पर्यटन मंत्रालयाला आपल्या स्तरावरुन सूचना निर्गमित कराव्यात, तसेच केंद्र सरकारच्या वतीने शिवस्वराज्य सर्किट विकसित झाल्यास मराठयांच्या इतिहासांच्या पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येण्यास सहाय्यभुत ठरणार असल्याने, शिवस्वराज्य सर्किट विकसित होणे गरजेचे आहे असेही अमित शहा यांच्याकडे स्पष्ट केले.गृहमंत्री अमित शहा यांनी आस्थेवायीकपणे सर्व मुद्दे समजून घेतले आणि यावर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या काही दिवसात याविषयी हालचाली सुरु होतील तथापि याकामी आमचा पाठपुरावा राहणार आहे असे ते म्हणाले.