वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब(प्रकाश) आंबेडकर यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांना काल सकाळी अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आज बाळासाहेब(प्रकाश) आंबेडकर यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी झाली. पुढील 24 तास त्यांना आयसीयूमध्ये अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जाणार आहे.
प्रकाश आंबेडकरांची तब्येत आता ठीक असून तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा, असे आवाहन वंचितचे युवा नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी केले आहे. बाळासाहेब यांच्यावर ॲन्जिओग्राफीत एक छोटा ब्लाॅक आढळून आल्यानंतर शस्त्रक्रिया पार पडली.
याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. ‘बाळासाहेब आंबेडकर यांची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली. बाळासाहेब पुढील 24 तास आयसीयूमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली असतील. तमाम हितचिंतक आणि जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि संदेशांसाठी सर्वांचे आंबेडकर कुटुंब आभार मानते”.
नेमकं काय घडलं?
बाळासाहेबांना छातीत दुखत होते आणि अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार अँजीओग्राफी करण्यात आली आहे. जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढील उपचार डॉक्टर कळवतील तसे आम्ही तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवू. आम्ही डॉक्टरांच्या रिपोर्टसाठी थांबलो आहोत. जसा रिपोर्ट येईल तशी माहिती बाळासाहेबांच्या आणि वंचितच्या हॅण्डलवरून कळवण्यात येईल, अशी माहिती सुजात आंबेडकरांनी दिली होती.