Breaking News

वरुण सरदेसाई होणार आमदार?

आज 23 सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांचा वाढदिवस असून, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डोंबिवलीतील स्टेशन परिसरात शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत. सरदेसाई यांचा भावी आमदार म्हणून या बॅनरमध्ये उल्लेख करण्यात आले आहे.वरूण सरदेसाई हे मुळचे डोंबिवलीकर आहेत, ज्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ते डोंबिवलीतून निवडणूक लढवणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. सरदेसाई यांच्या वाढदिवसामुळे त्यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेबाबत स्थानिक जनतेमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह राज्यभर शिवसेनेची (ठाकरे गट) मोट बांधण्यासा सुरुवात केली. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी ठाकरे कुटुंबाला पाठींबा दर्शवला. पण राजकारणात नव्याने उभारी घेतलेले युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनीही मातोश्रीवर असलेले नातं आणखी घट्ट केलं. ठाकरे गटाच्या राजकीय कार्यक्रमात किंवा आंदोलनात नेहमीच सक्रीय असणारे सरदेसाई राजकीय वर्तुळात प्रकाशझोतात आले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजवण्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाने डोंबिवलीत राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवली मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेना बालेकिल्ला आहे. पण आता डोंबिवलीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भावी आमदार’अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. सरदेसाईंचे अशाप्रकारचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मोठा राजकीय भूकंप करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.