रायबरेलीच्या मतदारांनी अत्यंत कठीण काळात माझी साथ सोडली नाही. आता प्रकृतीमुळे मी निवडणूक लढवू शकत नाही. परंतु आगामी काळात माझ्या कुटुंबाला तुम्ही सांभाळा, असे भावनिक आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज एका पत्राद्वारे रायबरेलीच्या जनतेला केले आहे.
राजस्थानमधून बुधवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज रायबरेलीच्या जनतेच्या नावाने एक पत्र प्रसिद्धीला दिले. त्यात म्हटले आहे की, माझे कुटुंब तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. तुमचा स्नेह व प्रेम माझ्या या सासुरवाडीतून सातत्याने मिळाले. रायबरेलीसोबत माझ्या कुटुंबाचे जुने ऋणानुबंध राहिले आहे. सासरे फिरोज गांधी व सासू इंदिरा गांधी यांना तुम्ही निवडून दिले.
यानंतर आयुष्यातील अनेक चढउतारांसह तुमच्याशी नाते अधिक वृद्धींगत होत गेले. सासू व माझ्या जीवनसाथीची नेहमीसाठी साथ सुटल्यानंतर तुम्ही मला पदरात घेतले. गेल्या दोन निवडणुकीत अत्यंत विपरीत स्थिती असताना सुद्धा तुम्ही एखाद्या खडकासारखे माझ्या पाठीशी उभे राहिलात. हे प्रेम मी कधीही विसरू शकत नाही.
आता वाढते वय व प्रकृतीच्या कारणामुळे पुढील लोकसभा निवडणूक लढणार नाही. परंतु माझे मन व जीवन तुमच्याजवळ नेहमीच राहील. मला जसे तुम्ही सांभाळले तसेच माझ्या कुटुंबाला भविष्यात तुम्ही सांभाळून घ्याल, असा मला विश्वास असल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.