आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर अनेक आरोप केले आहेत. प्राजक्ताताई माळी यांच्या अतिशय जवळचा पत्ता शोधायचा असेल तर तो आमचा परळी पॅटर्न असे सुरेश धस म्हणाले होते. त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत तिने आपली बाजू मांडत धस यांनी सर्व महिलांचा अपमान केल्याने सर्वांची माफी मागावी असे म्हटले आहे. आता यावर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी देखील पोस्ट करत यावर निषेध व्यक्त केला आहे.
सचिन गोस्वामी यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, ‘ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो.कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे..क्लेषदायक आहे.. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या’ असे म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसेच धनंयज मुंडे यांच्यासोबत एका कार्यक्रमानिमित्त भेट झाली होती आणि ती आयुष्यातील एकमेव भेट होती, असं स्पष्टीकरण प्राजक्ताने दिलं आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात बरीच खळबळ माजली आगे. प्राजक्ताचं नाव घेतल्यानंतर सुरेश धस यांनी स्पष्टीकरण देत माझं वक्तव्य पुन्हा ऐकावं असं म्हटलं होतं. पण त्यावरही प्राजक्ताने तीव्र संताप व्यक्त केला आहे.