कराडमधील प्रितिसंगम येथे असलेल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिली. यावेळेस त्यांना विरोधी पक्ष नेतेपदासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी खास शैलीमध्ये त्याला उत्तर दिलं. मोठं मन ठेऊन विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीला देणार का असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. अजित पवारांनी यावेळेस बोलताना राष्ट्रपती राजवट राज्यात लागू होणार नाही असंही सांगितलं.
राष्ट्रपती राजवट लागणार का असा प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवारांनी ही शक्यता फेटाळून लावली. “आज सकाळी उठून आम्ही तिघे-चौघे थेट इथे आलो. मी पुन्हा मुंबईला जाणार आहे. मुंबईला गेल्यावर पुढचं ठरवू. आपण बातम्या देत होता 27 तारखेपर्यंत सरकार आलं पाहिजे. नाहीतर राष्ट्रपती राजवट लागेल वगैरे. असं काहीही घडू शकत नाही,” असं अजित पवार म्हणाले.
तसेच पुढे बोलताना, “निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांची यादी माहिती राज्यपालांना दिली आहे. आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की विरोधी पक्षनेता करता येणार नाही एवढ्या जागाही त्यांना मिळालेल्या नाहीत. तरीही आम्ही, मी, एकनाथराव, देवेंद्रजी आम्ही विरोधकांचा मान-सन्मान ठेवण्याची पद्धत आम्ही सुरु ठेऊ. विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपण सन्मान देतो. ते प्रश्न मांडतील लोकांचे आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करु,” असं अजित पवार म्हणाले.
तसेच “अधिकारी, आयपीएस अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊ. पाच वर्षात मजबुतीने चालणार आहे हे सरकार. केंद्र सरकार साडेचार वर्ष चालणार. कसं राज्य सर्व श्रेत्रात आघाडीवर राहू याचा प्रयत्न करुन राज्य एक नंबरवर ठेऊ,” असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
जरा मोठं मन दाखवून तुम्ही विरोधी पक्षनेता पद देणार का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता अजित पवारांनी वर आकाशाकडे पाहत हसतच हातवारे करत, “आमचं मोठं मन आता पार फुटायला लागलंय,” असं म्हणताच पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. “तुम्ही अगदी सोयीचं विचारता. केंद्रामध्ये 54 च्या वर आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्षनेता पद मिळतं का? मग इथं कशी अपेक्षा करता?” असा सवाल अजित पवारांनी विचारला. त्यावर अन्य एका पत्रकाराने, “सक्षम लोकशाहीसाठी पाहिजे ना दादा?” असं म्हटलं. यावर अजित पवारांनी खोचकपणे त्याच्याकडे पाहत, “हो… हो तुलाच करायचं आहे ते,” असं म्हणताच सर्वजण हसू लागले.