kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“महाविकास आघाडी म्हटलं की, त्यामध्ये कद्रूपणा करायचा नाही” ; उद्धव ठाकरेंचा नागपुरातून थेट सल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपुरातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. पण त्याआधी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते सुनील केदार यांचे नाव घेत त्यांना महत्त्वाचा सल्लादेखील दिली. “रामटेक हा आपला बालेकिल्ला. सलग पाचवेळा शिवसेनेने जिंकला आहे. पण महाविकास आघाडी म्हटलं की, त्यामध्ये कद्रूपणा करायचा नाही”, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.

“सुनील माझे जुने सहकारी आहेत. अगदी 1995 मध्ये सुनील निवडणुकीला उभे होते. त्यावेळी मी बाबासाहेबांना भेटलो होतो आणि म्हणालो होतो की, बाबासाहेब महायुतीचं सरकार येईल याची खात्री आहे. पण आम्हाला अपक्षांची गरज लागेल. त्यावेळी बाबासाहेबांनी महायुतीचा विजय झाला तेव्हा फोन केला की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तेव्हापासून सुनील माझा सहकारी आहे. नंतर थोडासा दुरावा झाला. काँग्रेस, शिवसेना, भाजपा, पण परत आपण एकत्र आलेलो आहेत. आपल्याला अजून कुणी ओळखलेलं नाही. एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचा नाही. पाठीमागून वार करायचा नाही”, असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

“रामटेक मागितला, आम्ही रामटेक दिला. मला अभिमान आहे की, शिवसैनिकांनीदेखील दुजाभाव केला नाही. महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलात त्याबद्दल धन्यावाद देतो. ज्यावेळेला रश्मी ताईंचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं तेव्हा वाटलं की, आता काय करायचं? सुनील म्हणाले, काळजी करु नका. बर्वे दादा आहेत, निवडून येणार. निवडून आले आणि काल निकाल आला, प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णयच अवैध होता. मग गुन्हेगार का? आमचे उमेदवार प्रमाणपत्र घेतात ते किराणा दुकानात घेतात का? ज्यांनी प्रमाणपत्र अवैध ठरवलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकलं पाहिजे तर ही लोकशाही आहे हे म्हटलं पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“जनतेचा अनादर किती करायचा? काल तुम्हाला माहिती आहे, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी दहा जागा युवासेनेने जिंकल्या. सगळे पदवीधर आणि सुशिक्षित मतदार, त्यामध्येही आडकाठी आणली होती. दोन वर्ष सिनेट निवडणूक पुढे ढकलत होते. आता म्हणत आहेत की, जणू काही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरणारे आहेत. हो आहेच, सुशिक्षित मतदार होते. पेद्रे कोर्टात गेले. आपणही कोर्टात गेलो आणि कोर्टाने निवडणूक घेण्यास सांगितलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.