प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांच्यासह नांदेड पोटनिवडणुकीत विजय झालेल्या चव्हाण यांनीही मराठीतून शपथ घेतली. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर वायनाडची जागा मोकळी झाली होती. १३ नोव्हेंबर रोजी याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी यांनी विजय मिळविला. आज शपथविधीसाठी प्रियांका गांधी वाड्रा संसदेत काही खासदारांसह येत होत्या. त्यावेळी त्यांचा भाऊ आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना सभागृहाच्या दारावरच रोखले. त्यानंतर त्यांनी केलेल्या कृतीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
प्रियांका गांधी वाड्रा लोकसभेत येत असताना राहुल गांधी पुढे आले आणि त्यांनी स्टॉप, स्टॉप असे म्हणत प्रियांका गांधी यांना रोखले. राहुल गांधींच्या अचानक पवित्र्यामुळे प्रियांका गांधीसह इतर खासदार थोडावेळ भांबावतात. पण नंतर राहुल गांधी खिशातून मोबाइल काढून प्रियांका गांधीसह सर्व खासदारांचा फोटो घेतात. त्यानंतर ते सर्व फोटो प्रियांका गांधींना दाखवतात आणि मग सभागृहात घेऊन जातात.
प्रियांका गांधी खासदार झाल्यामुळे गांधी कुटुंबातील तीन खासदार संसदेत आले आहेत. सोनिया गांधी या राज्यसभेच्या खासदार आहेत. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे रायबरेलीचे खासदार आहेत. प्रियांका गांधी यांनी आज आपला भाऊ राहुल गांधी यांच्याप्रमाणेच संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ घेतली. जनतेचा आवाज उचलण्यासाठी मी सभागृहात आले आहे, असे प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या.
प्रियांका गांधी यांच्यासह नांदेडचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण यांनीही शपथ घेतली. वायनाडमधून प्रियांका गांधी यांनी एकूण ६,२२,३३८ एवढी मते घेतली. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवाराचा त्यांनी चार लाखाहून अधिकच्या मताधिक्याने पराभव केला. तर भाजपाच्या उमेदवार नव्या हरिदास यांना केवळ लाखभर मते मिळाली. नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी वडील वसंत चव्हाण यांच्या मृत्यूनंतर याठिकाणाहून निवडणूक लढविली होती. त्यांनाही ५ लाख ८६ हजार ७८८ एवढी मते मिळाली. अवघ्या १४५७ मतांनी त्यांनी भाजपाचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांचा पराभव केला.