आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी त्यांनी विठुरायाच्या चरणी राज्यातील वातावरण चांगलं राहू दे म्हणत सर्वांची प्रगती व्हावी असे साकडे मागितले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मनाच्या वारकऱ्यांच्या हस्ते देखील पूजा केली जाते. या वर्षी हा मान नाशिक जिल्ह्यातील सटाणा जिल्ह्यातील बाळू अहिरे आणि त्यांच्या पत्नीला मिळाला. गेल्या १६ वर्षापासून दोघेही पती पत्नी ही वारी न चुकता करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री शासकीय पूजेला सुरुवात केली. तब्बल एक तास ही पूजा चालली. या वर्षी आषाढी सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान हा नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंबला मिळाला. नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंब हे १६ वर्ष नित्यनियमाने पंढरीची वारी करत आहेत. बाळू शंकर अहिरे व त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे या विठुरायच्या निस्सीम भक्त आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची मनोभावे महापूजा केली.

शेतकरी बाळू शंकर अहिरे, (वय ५५) व आशाबाई बाळू अहिरे (वय ५० मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक) या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना १ वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. या मानाबद्दल अहिरे दाम्पत्य म्हणाले, आई वडिलांच्या पुण्यामुळेच विठुरायाच्या पूजेचा मान आम्हाला मिळाला. माझ्या आई-वडिलांची पुण्याई होती त्यामुळे पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळाला.आम्ही अनेक तास रांगेत उभे होतो. त्यानंतर आम्हाला हा मान मिळाला. ही बाब आमच्या साठी भाग्याची आहे. अहिरे दाम्पत्य हे शेतकरी आहे.

आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.