kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण?

बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच गोळाबाराच्या घटनेत अक्षय शिंदे ठार झाला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. अक्षयने एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या झाडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. प्रत्युत्तरात गोळीबार केला असता त्याचा मृत्यू झाला. ज्यांच्या गोळीमुळे अक्षयचा मृत्यू झाला, त्या पोलीस अधिकाऱ्याने यापूर्वी प्रसिद्ध चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मांबरोबर काम केले होते, अशी माहिती समोर येत आहे.

ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे समजते. मात्र, पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात त्यांचा उल्लेख झालेला नाही. संजय शिंदे यांनी याआधी ठाणे पोलिसांच्या गुन्हे विभागात खंडणी विरोधी पथकात काम केलेले आहे. या पथकाचे नेतृत्व प्रसिद्ध चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केले होते. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक करणाऱ्या पोलिसांच्या टीममध्ये त्यांचा सहभाग होता.

प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील एनकाऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत १०० हून अधिक जणांना चकमकीत ठार केले होते. १९८३ साली मुंबई पोलीस दलात भरती झाल्यानंतर १९९० साली अंडरवर्ल्ड जगतातील गुंडांना चकमकीत ठार केल्यानंतर शर्मा चर्चेत आले होते. दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन टोळीतील अनेक गुंडांना त्यांनी कंटस्नान घातले होते. २००६ साली छोटा राजनचा सहकारी लखन भैया याला बोगस चकमकीत ठार केल्याप्रकरणी प्रदीप शर्मा दोषी आढळले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

संजय शिंदे यांनीही मुंबई पोलीस दलात काम केलेले आहे. सध्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात त्यांचा समावेश होता. खुनाचा आरोपी विजय पालांडे पोलीस कोठडीतून पळून गेल्या प्रकरणी संजय शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच त्यांना चौकशीचा सामना करावा लागला होता. विजय पालांडे आणि संजय शिंदे एकमेकांना ओळखत असल्यामुळे शिंदे यांनी त्याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.