kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२३ जाहीर; खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आले असून कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या २१ जानेवारी रोजी वितरण होणार आहे.

या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण सकाळी १२ वाजता अभिनव एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे होणार आहे.

चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सातत्याने तरुणांसाठी प्रोत्साहनपर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, पत्रकारिता आणि इनोव्हेशन क्षेत्रांतील विविध गुणवंत युवकांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजार आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे.

यंदाचा २०२३ सालचा युवा क्रीडा पुरस्कार स्वप्नील कुसळे ( शुटर ), अदिती स्वामी ( आर्चरी चॅम्पियन ) यांना जाहीर झाला आहे.

सामाजिक युवा पुरस्कारात सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राही मुजुमदार व राजू केंद्रे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राला कला-साहित्याची मोठी परंपरा आहे. अनेक कलांचे उगमस्थान असलेल्या या भूमीतील रंगमंचीय कलाविष्कार (परफॉर्मिंग आर्ट्स) सादर करणाऱ्या युवांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये नृत्य विभागात मयूर शितोळे, लोककला विभागात जगदीश कन्नम आणि पर्ण पेठे, नाट्यविभाग यांना जाहीर झाला आहे.

मराठी भाषेत मागील पाच वर्षांत साहित्यकृतींचे लिखाण करणाऱ्या युवक व युवतींना साहित्य युवा पुरस्कार २०२३ देऊन गौरव करण्यात येत आहे. या पुरस्कारांमध्ये अमोल देशमुख व पूजा भडांगे यांची निवड करण्यात आली आहे.
आपल्या उद्योगाच्या माध्यमातून, त्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत,पर्यावरणीय समतोल व शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या उद्योग धंद्यात विविध प्रयोग करीत तसेच रोजगाराची निर्मिती करीत आपल्या भागात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मिनल वालावलकर-वर्तक आणि संदेश भोसले या युवा उद्योजकांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पत्रकारिता युवा पुरस्कारात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिपाली जगताप व कुलदीप माने यांची निवड करण्यात आली आहे. तसेच इनोव्हेशन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साक्षी धनसांडे, डॉ. प्रशांत खरात यांना युवा इनोव्हेटर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.