मुसळधार पाऊस आणि पुरासोबतच या वादळाने चीनमध्येही कहर केला आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. चीनच्या दक्षिण-पूर्व भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे एक घर कोसळले, त्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही माहिती चिनी प्रसारमाध्यमांच्या वृत्तातून मिळाली आहे. चीनमधील शांघाय येथे वादळामुळे झाड पडल्याने एका कंपनीच्या प्रतिनिधीचा मृत्यू झाला, असे चीनच्या डिजिटल न्यूज वेबसाइट ‘द पेपर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे.

अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, चीनमधील हे मृत्यू कदाचित उष्णकटिबंधीय चक्रीवादळ ‘जेमी’मुळे झाले आहेत. हुनान प्रांतातील हेंगयांग शहराजवळ असलेल्या युएलिन गावात सकाळी ८ वाजता भूस्खलनामुळे एक घर कोसळल्याचे चीनचे राज्य माध्यम ‘सीसीटीव्ही’ने सांगितले. भूस्खलनात १८ जण अडकले असून सहा जखमींना वाचवण्यात आल्याचे आधीच्या वृत्तात म्हटले आहे.

या भूस्खलनाच्या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. तथापि, ताज्या बातम्यांमध्ये अजून एक व्यक्ती बेपत्ता आहे की नाही हे स्पष्ट झाले नाही. या घटनेत जखमी झालेल्यांना किरकोळ किंवा गंभीर दुखापत झाली आहे की नाही, याबाबत कोणतीही माहिती नाही. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे ही दरड कोसळल्याचे सांगण्यात आले. मदत आणि बचाव पथके घटनास्थळी आहेत.