Breaking News

झारखंडमध्ये पहिल्या सत्रात १३ टक्के मतदान !

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी तर उर्वरित ३८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ‘इंडिया’ आणि रालोआ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) अशा दोन्ही आघाड्यांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे. भाजपाने केलेल्या जोरदार टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर, आरोपांच्या फैरी आदींनी निवडणूक प्रचाराचा पहिला टप्पा गाजला. पहिल्या टप्प्यातील सकाळच्या सत्रात आतापर्यंत १३. ४ % मतदान झालं आहे.

पहिल्या टप्प्यात बुधवारी होणाऱ्या मतदानाबाबतही नियमावली ठरवण्यात आली आहे. रांची विधानसभा मतदारसंघाचे रिटर्निंग अधिकारी उत्कर्ष कुमार यांनी सांगितलं की, सकाळी साडेपाच वाजला मॉक पोल सुरू झाला. तर सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, शौचालय आणि वेब कास्टिंगची सुविधा दिली गेली आहे. याशिवाय सुरक्षेसाठी सीएपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

‘झारखंडमध्ये आदिवासींची लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. येथे भाजपाचे सरकार आल्यास घुसखोरांची ओळख पटवून त्यांना हुसकावून लावण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल तसेच त्यांनी बळकावलेल्या जमिनीवर पुन्हा दावा केला जाईल, आदिवासी महिलांशी विवाह करणाऱ्या घुसखोरांना जमिनीचे हस्तांतरण रोखण्यासाठी कायदा आणला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केली.

झारखंडमध्ये भाजपाचा प्रचार केवळ सांप्रदायिक ध्रुवीकरणावर केंद्रित आहे. १० वर्षांच्या सत्तेनंतरही भाजपा केवळ धार्मिक ध्रुवीकरणावर मते मागत असल्याचा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. येत्या १३ आणि २० नोव्हेंबर रोजी झारखंडमधील जनता सातत्य, जातीय सलोखा आणि आत्मसन्मानासाठी निर्णायकपणे मतदान करतील, असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केला. झारखंडमधील ‘इंडिया’ आघाडीचा प्रचार गेल्या पाच वर्षांतील सरकारच्या कामगिरीवर आहे, आम्ही सर्वसमावेशक आणि समृद्ध झारखंडसाठी आमची दृष्टी आदींवर लक्ष केंद्रित करत आहोत’, असेही रमेश म्हणाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने ३० जागा जिंकल्या होत्या. भाजपाला २५ आणि काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील जागांसाठी ७३ महिलांसह एकूण ६८३ उमेदवार रिंगणात आहेत. ४३ मतदारसंघांपैकी १७ सर्वसाधारण जागांसाठी २० अनुसूचित जमातीसाठी आणि सहा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *