kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर

10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगानं आज शुक्रवारी (22 मे) या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, या 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठीच्या निवडणुका 18 जून 2026 रोजी पार पडतील. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर, संबंधित राज्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सर्वाधिक जागांवर प्रत्येकी 4 जागांवर मतदान घेतलं जाईल.

निवडणूक आयोगानं जारी केलेल्या निवेदनानुसार, 10 राज्यांमधील विद्यमान खासदार 21 जून ते 19 जुलै दरम्यान वेगवेगळ्या तारखांना राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. राज्यसभेच्या निवडणुका आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या प्रत्येक राज्यात 4 जागांसाठी मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रत्येक राज्यात तीन जागांसाठी, झारखंडमध्ये दोन जागांसाठी आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश व मिझोराम या प्रत्येक राज्यात एका जागेसाठी होणार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांसारखे प्रमुख नेते राज्यसभा सदस्यत्वावरून निवृत्त होणार आहेत. राजस्थानमधील राजेंद्र गहलोत, नीरज डांगी आणि रवनीत सिंह यांच्याकडील जागाही रिक्त होणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार, 1 जून रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवार 8 जूनपर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील. उमेदवारी अर्जांची छाननी 9 जून रोजी होईल, तर उमेदवारांना आपली नावं मागं घेण्यासाठी 11 जूनपर्यंत मुदत असेल.

निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेसंदर्भात विशेष निर्देश जारी केले आहेत. आयोगानं स्पष्ट केलं आहे की, मतदानादरम्यान केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी (Returning Officer) पुरवलेला विशेष जांभळ्या रंगाचा स्केच पेनच वापरला जावा. इतर कोणत्याही पेनाचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार नाही. निष्पक्ष मतदान सुनिश्चित करण्यासाठी निरीक्षकांचीही नियुक्ती केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *