मोशी कचरा डेपो येथील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पात गुरुवारी (९ जुलै) झालेल्या भीषण दुर्घटनेने एका उमलत्या संसाराचा क्षणार्धात अंत केला. शिरसोली प्र.न. (ता. जि. जळगाव) येथील मूळ रहिवासी आणि निगडी (रुपिनगर) येथे वास्तव्यास असलेले भावेश मोहन वाणी (वय ३४) यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगावसह पिंपरी-चिंचवड परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे, दुर्घटनेच्या काही क्षणांपूर्वीच दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी भावेश यांनी आपल्या पत्नीला “जेवायला बसलो आहे” असा साधासा संदेश पाठवला होता. कोणालाही कल्पना नव्हती की, हा संदेश त्यांच्या आयुष्यातील शेवटचा संवाद ठरेल.
दुपारी दीडच्या सुमारास मोशी येथील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाची तीन मजली प्रशासकीय इमारत कचऱ्याच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली कोसळली. या दुर्घटनेत अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका, एनडीआरएफ आणि भारतीय सैन्याने युद्धपातळीवर बचावकार्य राबवले.
भावेश हे आपल्या आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. पाच वर्षांपूर्वीच मुलगी गमावलेल्या वाणी कुटुंबासाठी भावेश हेच जगण्याचा एकमेव आधार होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वडील मोहन वाणी यांनी घरोघरी जाऊन पापड आणि पाव विकत मुलाला शिकवले. अभ्यासात हुशार असलेल्या भावेश यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर करिअर घडवले आणि वृद्ध आई-वडिलांना सुखाचे दिवस दाखवण्याचे स्वप्न पाहिले.
अवघ्या दीड वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या भावेश यांनी पत्नीसोबत नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवली होती. मात्र नियतीने त्यांचा संसार क्षणार्धात उद्ध्वस्त केला. ज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई-वडिलांनी आयुष्यभर कष्ट केले, त्याच मुलाची अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ आज त्यांच्यावर आली आहे.
या दुर्घटनेने संपूर्ण शिरसोली गावासह जळगाव आणि पिंपरी-चिंचवड परिसर हळहळला आहे. भावेश वाणी यांच्या अकाली निधनाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि वाणी कुटुंबाला हे असह्य दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी भावना व्यक्त केली जात आहे.













Leave a Reply