धाराशीव येथील अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान धाराशीव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सौ. अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली.

महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशीवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. धाराशीव मतदारसंघातील एक वेगळेच चित्र आज इथे पहायला मिळाले आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार यांनी आज जाहीर होणाऱ्या उमेदवारासाठी एकत्रितपणे पत्रकार परिषदेला हजेरी लावली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात जसे अभूतपूर्व यश महायुतीला मिळणार आहे. तसे यश धाराशीव मतदारसंघात सौ. अर्चना पाटील या मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्ह वापरासंदर्भात आदेश दिला आहे मात्र ज्यांची मनोवृत्ती ढासळली आहे अशा लोकांची वक्तव्ये प्रसारमाध्यमांमध्ये ऐकली. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राहिल आणि घड्याळ चिन्ह वापरापूर्वी एखादी जाहिरात द्यावी त्याप्रमाणे वर्तमानपत्र आणि टिव्ही चॅनलवर ठळकपणे जाहिरात दिलेली आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने हेही नमूद केले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधिन राहून’ हे वाक्य लिहायला सांगितले आहे त्याप्रमाणे पालन होत आहे. याउलट तथाकथित शाहू – फुले – आंबेडकरांचे समर्थक म्हणवणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आणि सतत लोकांची दिशाभूल करत असतात त्यांच्या ट्वीटबाबत सर्वोच्च न्यायालयाने टिका केली आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.

शरद पवारसाहेबांचा फोटो लावण्याबाबत त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवारसाहेबांचा फोटो न लावता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आम्ही वापरत आहोत. शिवाय महाराष्ट्रातील आमच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना घड्याळ चिन्ह वापराबाबत स्पष्टता सांगण्यात आली आहे. मात्र जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

या पक्ष प्रवेश आणि पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, धाराशीवचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजप आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप आमदार राजाभाऊ राऊत, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.