साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

आज शुभ मानल्या जाणाऱ्या, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा दिवस आहे. वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेचा दिवस हा वर्षातील शुभ दिवसांपैकी एक आहे. हा दिवस त्रेतायुगाचा प्रारंभही मानला जातो. या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळतं असे देखील म्हणतात. ‘न क्षय इति अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, तो अक्षय होय.

या दिवसाचं खास महत्त्व आहे. या दिवशी जे काही शुभ कार्य, उपासना किंवा दान केले ते सर्व अक्षय्य होते असे मानले जाते. आजच्या दिवशी विष्णू भगवान यांची चंदनाने पूजा केली जाते. आज विष्णू भगवान यांची पूजा केल्यामुळे जीवनात आणि कुटुंबात आनंद आणि उत्साह कायम राहतो. जर तुम्हालाही तुमच्या जीवनात सुख-समृद्धी आणि कुटुंबातील सर्वांमध्ये सामंजस्य टिकवायचे असेल, तर आज आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी.

आज केलीली कोणतीही गोष्ट अक्षय राहते अशी मान्यता असल्याने आज देवी सरस्वतीची उपासना देखील करावी असे म्हंटले जाते. महर्षी व्यासांनी आजच्याच दिवशी महाभारत या ग्रंथाच्या लेखनास श्री गणपतींच्या हस्ते श्रीगणेशा केला.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली असे मानले जाते. याशिवाय वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला परशुराम जयंतीही साजरी केली जाते. या दिवशी परशुरामजींचा जन्म झाला असं मानलं जातं. आज, परशुरामजींच्या मूर्तीची पूजा सूर्यास्तानंतर केली जाते. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वृंदावन स्थित श्री बांके बिहारीजींच्या मंदिरात केवळ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्री विग्रहाच्या चरणांचं दर्शन होतं.

एवढंच नाही तर, आजच्या दिवशी उत्तराखंड येथील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या बद्रीनारायण या तीर्थक्षेत्राचे दरवाजेही उघडतात. नोव्हेंबरच्या आसपास बद्रीनारायणाचे दरवाजे जवळपास सहा महिने बंद असतात आणि आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हे दरवाजे उघडले जातात, पण मंदिराचे दरवाजे बंद असतानाही आतमध्ये अखंड ज्योत असते. ज्या दिवशी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात, त्या दिवशी सहा महिने पुरेल एवढ्या तुपाने भरलेला मोठा दिवा लावला जातो आणि ज्योत प्रज्वलित केली जाते. त्या दिवशी भगवान बद्रीनारायण यांची विशेष पूजा केली जाते. त्यानंतर मंदिरापासून 40 मैल अंतरावर असलेल्या ज्योतिर्मनच्या नरसिंह मंदिरात भगवंताची मूर्ती ठेवली जाते. त्यानंतर आज म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कपाट उघडल्यानंतर मुर्ती पुन्हा बद्रीनारायण मंदिरात ठेवली जाते. या मुहूर्तावर बद्रीनारायण देवाची विषेश पूजा केली जाते. पुजेसाठी भक्त लांबून देवाच्या दर्शनासाठी आणि अखंड ज्योत पाहण्यासाठी येत असतात.

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर फक्त शुभकार्य, दान नाहीतर, या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि पिंड दान करण्याचेही महत्त्व आहे. पितरांसाठी मातीचे भांडे दान करावे. उन्हाळ्यात जलयुक्त घट दान अर्पण केल्याने पितरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला कायम लाभतो. अशी देखील मान्यता आहे.