Breaking News

आळंदी ते पंढरपूर ‘चित्रवारी’चा,दि. २५ जून रोजी आळंदीत शुभारंभ!!

भक्तीरसाने नाहून निघालेल्या परंपरागत वारीवर आधारित ‘दिठी’या मराठी चित्रपटाचा विशेष शो आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावर दि. २५ जून ते १७ जुलै या कालावधीत प्रमुख गावे आणि शहरांमध्ये करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित या उपक्रमाचे मंगळवार दि. २५ जून २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आळंदी येथील सद्गुरू अमृतनाथ संस्था येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

या प्रसंगी अभिनेते व या चित्रपटाचे निर्माते डॉ. मोहन आगाशे ,समर्थ युवा फौंडेशन अध्यक्ष राजेश पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. अशी माहिती या प्रकल्पाच्या संकल्पनेचे जनक संयोजक ‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली.

या चित्रपटाची कथा ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे व अभिनेते डॉ मोहन आगाशे यांची असून या मध्ये दिलीप प्रभावळकर ,डॉ मोहन आगाशे , किशोर कदम ,उत्तरा बावकर, गिरीश कुलकर्णी ,अमृता सुभाष ,शशांक शेंडे, अंजली पाटील ,कैलाश वाघमारे , ओंकार गोवर्धन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दि. २५ जून रोजी या चित्रपटाचा पहिला प्रीमियर आळंदी येथे झाल्यानंतर आळंदी ते पंढरपूर या वारीच्या मार्गावर प्रमुख १० गावांमध्ये हा चित्रपट सर्व भक्त व नागरिकांना विनामुल्य दाखवण्यात येणार आहे. यामध्ये आळंदी ,पिंपरी चिंचवड ,पुणे ,हडपसर ,सासवड ,जेजुरी , फलटण ,नातेपुते ,वाखरी व पंढरपूर असे १० प्रीमियर शो होतील . हे सर्व शो विनामुल्य असतील. दिनांक २५ जून रोजी आळंदीहून निघालेली ही चित्रवारी पंढरपूरला १७ जुलै रोजी पोहोचेल व तेथे समारोपाचा शो होईल.

याचे संपूर्ण नियोजन बारकाईने पूर्ण करण्यात आले असून गावोगावी वारकरी संप्रदाय ,शाळा ,कॉलेजेस ,सार्वजनिक मंडळे ,पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम यांचे सहकार्य या कामी लाभले आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मागील वर्षी प्रमाणेच याही वर्षी या उपक्रमास भरघोस सहयोग दिला आहे. मागीलवर्षी देहू ते पंढरपूर या वारीच्या मार्गावर योगेश सोमण लिखित ‘आनंदाडोह’ या संत तुकारामांच्या जीवानावर आधारित एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याची संकल्पना ‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन यांची असून संयोजनात श्रीमहंत पुरुषोत्तमदादा महाराज आळंदीकर , निकिता मोघे , आळंदी देवस्थानचे विश्वस्त भावार्थ देखणे यांचा सहयोग लाभला आहे.