kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले, त्यांच्या आरोपांना भाजपा आमदारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले ; बघा नेमके काय घडले

विधानसभेत आज (३ जुलै) अर्थसंकल्पावर चर्चा चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांना भाजपा आमदारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त राज्यभरातील जनतेसाठी दुसरी कोणतीही योजना आणली नाही. त्यांनी शहरी भागातील नागरिकांना अर्थसंकल्पात काय दिलं? मुंबई, ठाणे, पुण्यातील लोकांसाठी कुठली योजना आणली का? राज्य सरकारने शेतकऱ्यांची मागील थकबाकी देखील माफ केलेली नाही. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत तुमची जागा दाखवली.

‘लाडकी बहीण योजने’वरून राज्य सरकारला टोला लगावत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “घरोघरी पैसे पाठवून लोक मतं देत नाहीत. राज्य सरकारने लोकांची वीजबिलं माफ केलेली नाहीत. शहरातही गरीब माणसंच राहतात. त्यामुळे कष्टकऱ्यांचंही ३०० युनिटपर्यंतचं वीजबिल माफ करावं, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांप्रमाणे कष्टकऱ्यांच्याही गरजा आहेत. मात्र राज्य सरकार त्यांचं अस्तित्व का नाकारतंय? हे आम्हाला समजलेलं नाही. तुम्ही कष्टकऱ्यांचं किती शोषण करणार आहात? मतांसाठी नेहमीच त्यांचा वापर करत आला आहात. परंतु, राज्यातील जनता दूधखुळी नाही. ती येत्या निवडणुकीत तुम्हाला उत्तर देईल.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी अवघ्या काही दिवसांत ७५ हजार कोटींपर्यंतच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. त्यातूनच एकेका मतदारसंघात ५०, ७० ते ८० कोटी रुपये वाटण्यात आले. आता विधानसभा निवडणुकीत तर हे लोक पैशांचा पाऊस पाडतील. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं? या स्मारकांचं काम कुठवर आलं? हे मात्र ते सांगत नाहीत.

दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षांनी जितेंद्र आव्हाड यांना भाषणाची वेळ संपली असून भाषण आटोपण्यास सांगितलं. तेवढ्यात भाजपा आमदार अतुल भातखळकर उभे राहिले आणि म्हणाले, आज सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणं अपेक्षित होतं. अनेक विषय घेता येतील. मात्र विरोधक खोटे आरोप आणि जातीयवादी वक्तव्ये करत आहेत. आम्ही हे सहन करणार नाही. ज्या व्यक्तीवर अपहरणाचा खटला चालू आहे, मंत्री असताना ज्यांनी स्वतःच्या बंगल्यावर लोकांना नेऊन मारहाण केली, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप केल्यानंतर, आदेश दिल्यानंतर ज्यांच्यावर खटले दाखल झाले त्यांनी काहीही बोलू नये.

भातखळकरांपाठोपाठ भाजपा आमदार संजय कुटे म्हणाले, एकेका मतदारसंघात ५० कोटी, ८० कोटी रुपये वाटल्याचा आरोप आव्हाड करत आहेत. परंतु, त्यांच्याकडे याचे पुरावे आहेत का? कोणीही निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा एकही रुपया अधिक खर्च केलेला नाही. त्यामुळे आव्हाडांचं वक्तव्य विधानसभेच्या पटलावरून वगळलं जावं. अन्यथा आव्हाडंनी पुरावे सादर करावे.