आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर यांना क्लीन चीट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.
जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला. यानंतर आता मुंबई महापालिकेने गैरसमजातून हा गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
रविंद्र वायकर यांच्यावर आरोप काय?
मुंबईतील जोगेश्वरी या भागात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप रविंद्र वायकरांवर झाला होता. या कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात रविंद्र वायकर यांचा हात असल्याचा आरोप होता. मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेलं क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम झाल्याचा आरोप करण्यात आला होता. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या पालिकेच्या जमिनीवर बांधकाम झाल्याचे बोललं जात होतं. मुंबई महापालिकेच्या जागेवर असलेल्या या 5 स्टार हॉटेलची किंमत 500 कोटींच्या घरात असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी रविंद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण
मुंबईतील जोगेश्वरीच्या मजासवाडी भागात 13 हजार 674 चौरस फुटांचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे. हा भूखंड मैदानासाठी आणि रूग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. या भूखंडाची किंमत 500 कोटींच्या घरात आहे. या राखीव भूखंडावर रविंद्र वायकर यांनी 5 स्टार हॉटेल बांधलं असल्याचा आरोप करण्यात आला होता.
विशेष म्हणजे या बांधकामासाठी वायकर यांनी मुंबई महापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती, असा त्यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी रविंद्र वायकर यांची चौकशी सुरु होती. चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. मात्र वायकर या चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली होती.