पुणे जिल्ह्यात काल रात्री पासून पावसाने कहर केला आहे. रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याने नद्यांना पुर आला आहे. तर घाट विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची ही शक्यता पाहता पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे ही पुढील दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. पर्यटकांनी या ठिकाणी जाण्याचे टाळावे व सजग नागरिकासारखे वागावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, मावळ, मुळशी तसेच आंबेगाव तालुक्यात माळीन येथे जाणाऱ्यारस्त्यावर दरड कोसळली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे. पुण्यात घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. पुढील काही तासांत या ठिकाणी पावाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या भर पावसात अनेक पर्यटक हे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. मात्र, या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे ही पुढील दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत. नागरिकांनी सहकार्य करून अशा धोकादायक स्थळी जाण्याचे टाळावे असे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

पुण्यातील लोणावळा, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात प्रामुख्याने पर्यटन स्थळे आहेत. लोणावळा, ताम्हीणी घाट, पवना धरण, मुळशी धरण, खडकवासला या सारख्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र, सध्या या परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले असून खबरदारी म्हणून ४८ तासांसाठी सर्वपर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहे.

मावळ तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्वच नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथे असणारी इंद्रायणी नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याने पाणी साकव पुलापर्यंत आले आहे. तर कुंडदेवी मातेचे मंदिर देखील पाण्याखाली गेल्याने येथे पर्यटन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुण्यात मुसळधार पावसानं थैमान घातले आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील सखल भागात पाणी साचूले असून अनेक ठिकाणी पुरस्थिती तयार झाली आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.