भाजप आणि महायुतीमधील लोक निवडणूक घ्यायला घाबरत आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये घ्यायला पाहिजे होत्या, मात्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आणि निवडणुका लांबणीवर गेल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, आता विधानसभा निवडणुक घ्यायला हे सरकार घाबरत आहेत. या निवडणुका कश्यापद्धतीने पुढे ढकलाव्या यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आमची मागणी आहे की ऑक्टोबरमध्ये निवडणूक घ्यायला पाहिजे. निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीचा सत्कारच होईल. किंबहुना निवडणुका लांबणीवर नेण्याचा निर्णय सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने घेतला, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. ते नागपूर येथे बोलत होते.

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या निवडणुकीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये पार पडेल. तर, हरियाणाची निवडणूक एका टप्प्यात होणार आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. त्यामुळे राज्यात साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नेमकी कधी होणार, हे अद्याप तरी समोर आलेलं नाहीये. त्यामुळे याच मुद्द्याला घेऊन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकार आणि भाजपवर निशाणा साधलाय.