kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवमध्ये मात्र त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या धाराशिवमधील परांडा विधानसभा मतदारसंघात येणार आहेत. त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होऊ शकते. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. 48 पैकी 31 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षांना अवघ्या 17 जागांवर समाधान मानाव लागलं. लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने महाविकास आघाडीमध्ये उत्साह आहे. कारण वातावरण आपल्या अनुकूल आहे असा मविआचा दावा आहे.

विधानसभा निवडणुकीआघी दोन्ही आघाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग-आऊटगोईंग होऊ शकतं. त्याची सुरुवातही झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवमध्ये येत आहेत. त्याआधी ठाकरे गटाला एक मोठा झटका बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परंडा येथे ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. धाराशिव विधानसभा मतदारसंघात शिवाजी कापसे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पत्रिकेत नाव आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादीबाबतच्या विधानानंतर अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागले आहे. महिला सशक्तीकरण अभियानाच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत आज ‘राईट टू हेल्थ’ अभियानाची घोषणा करण्याची शक्यता आहे. लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमाद्वारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत आज जोरदार शक्तीप्रदर्शन करतील.