आज, मंगळवारी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार तिसऱ्या कार्यकाळातील १०० दिवस पूर्ण करीत आहे. ‘लखपती दीदी’ योजनेचा विस्तार आणि महाराष्ट्रातील वाढवण बंदराच्या पायाभरणीसह अनेक पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे, या सरकारचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, ७४ वर्षांचे होणार असून, ७५व्या वर्षांत पदार्पण करतील. हा योग जुळून आल्याने यानिमित्ताने आपला ‘विकासपथ’ अधोरेखित करण्याच्या हालचाली सरकारच्या पातळीवर सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी यांनी भाजप मंत्री आणि नेत्यांना पुढील १०० दिवसांचा ‘रोडमॅप’ आखून दिला होता. मात्र, तो भाजपच्या स्वबळावरील सत्तेसाठी होता. त्या बैठकीत जबाबदाऱ्या दिलेल्या अनेक नेत्यांचा व मंत्र्यांचा निवडणुकीत पराभव झाला. मात्र, केंद्रातील सनदी अधिकाऱ्यांनाही ‘एनडीए’ सरकार येण्यापूर्वी १०० दिवसांचा ‘रोडमॅप’ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक योजनांवर लक्षणीय काम सुरू झालेले दिसते.
मोदी यांच्या नव्या कार्यकाळातील पहिल्या शंभर दिवसांत ‘लखपती दीदी’ योजनेचे यश ठळकपणे दिसते. देशात सध्या एक कोटीहून अधिक ‘लखपती दीदीं’ची नोंदणी झाली आहे. याच कालावधीत सुमारे १५ लाख कोटी रुपयांच्या नवनवीन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्प सुरू होताना भूमिपूजनावेळीच त्यांच्या उद्घाटनाच्या तारखाही जाहीर करणे आणि त्या पाळणे हेही मोदी यांचे मोठे यश मानले जाते.