आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे मात्र देशात वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणे हा भाजपचा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट करण्याचे पहिले पाऊल आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

काल केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन या निवडणूक प्रक्रियेला मंजुरी दिली. याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. याबाबत सविस्तार बोलताना ते म्हणाले की, देशाची घटना बदलण्याच्या मनसुब्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. आता पुन्हा घटना बदलण्याचा प्रकार भाजप समोर आणत आहे अशी टीका त्यांनी केली. भारतीय जनता पक्षाने नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टाळलेल्या आहेत. ते वन नेशन वन इलेक्शनची भाषा बोलतात हे आश्चर्यकारक आहे. मागे लोकसभा निवडणुकीत सात टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यातही गोंधळ झाला अशा परिस्थितीत वन नेशन वन इलेक्शन करणे शक्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.