बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.
“याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात?,” अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
“बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे.. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे,” असं ते म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे याला तपासासाठी नेत असता. त्याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्याने चौकशासाठी नेलं जात होतं. यादरम्यान त्याने पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार केला. त्यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अन्य पोलीसही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका
“मुलीवर अत्याचार केल्यानंतर विरोधक आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते. पण आता माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य करणाऱ्याची बाजू घेत असतील तर ते दुर्दैवी आहे. हे निंदाजनक असून, निषेध करावा तितका थोडा आहे. विरोधी पक्षाला जे हवं ते बोलण्याचा अधिकार आहे. एक पोलीस जखमी आहे, त्याचं यांना काही देणंघेणं आहे. जे पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करतात, सणांना थंडी वाऱ्यात, पावसात उभे राहून काम करतात. त्यांच्यावर आक्षेप घेणे, प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य नाही,” अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.