मध्य प्रदेशनंतर आता भाजपने राजस्थानमध्ये दुसरा धमाका केला असून पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधराराजे शिंदे यांना बाजूला करून भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.

राजस्थान भाजप म्हणजे वसुंधरा राजे हे समीकरण मोडीत काढत भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले आहे. आज, मंगळवारी 12 डिसेंबर रोजी झालेल्या भाजप आमदार गटाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, प्रेमचंद बैरवा आणि दिया कुमार या दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. तर वासुदेव देवनानी यांची विधानसभेचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भजनलाल शर्मा हे भरतपूरचे असून ते सांगानेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप असतानाही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा 48,081 मतांनी पराभव केला. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप संघटना या दोघांच्याही जवळचे मानले जातात.