इस्रायल-लेबनॉन वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (30 सप्टेंबर) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये इस्रायल-लेबनॉन वादावरही चर्चा झाली. पीएण मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे या संभाषणाची माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींबद्दल इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली. आपल्या जगात दहशतवादाला कुठेही स्थान नाही. प्रादेशिक तणाव रोखणे आणि सर्व बंधकांची सुटका सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले तीव्र केले आहेत. शुक्रवारी इस्रायलने हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख नसराल्लासह अनेक कमांडर मारले. त्यानंतर हे युद्ध आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
इस्रायलने हमासच्या लेबनॉनमधील ठिकाणांवर हल्ला करुन कमांडर फतेह शेरीफ याचाही खात्मा केला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने ही माहिती दिली. आयडीएफने म्हटले की, हा हल्ला पहाटे करण्यात आला. दक्षिण लेबनीज शहरातील अल-बास निर्वासित शिबिरावर झालेल्या हवाई हल्ल्यात हमास प्रमुख फतेह शेरीफ, त्याची पत्नी आणि मुले ठार झाले आहेत.