‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन नुकताच संपुष्टात आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने या सिझनचं विजेतेपद पटकावलं आहे. तर गायक अभिजीत सावंत फर्स्ट रनर अप (दुसऱ्या स्थानी) ठरला.
रविवारी 6 ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस मराठी 5’चा अंतिम सोहळा पार पडला. त्यानंतर मंगळवार सकाळी सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांनी मुंबईतल्या दादर इथल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. सूरजने गणपती बाप्पासमोर बिग बॉसची ट्रॉफी ठेवली आणि त्यांचे मनापासून आभार मानले. 70 दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर सूरज आणि अभिजीत यांनी सर्वांत आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
सूरज आणि अभिजीतवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सूरज आणि अभिजीतसोबतच निक्की तांबोळी, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर हे टॉप 5 मध्ये पोहोचले होते. तर जान्हवी किल्लेकर 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली होती. ‘बिग बॉस मराठी 5’ जिंकल्यानंतर सूरजला 14.6 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. त्याचसोबत 10 लाख रुपयांचं ज्वेलरी वाऊचर मिळालं. इतकंच नव्हे तर त्याला इलेक्ट्रीक स्कूटरसुद्धा मिळाली होती.