अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले आहे. बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या अतुल परचुरे यांना यकृताचा कॅन्सर झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. परंतू अखेर कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली. नाटक, सिनेमा, मालिका अशा विविधांगी माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु, मध्यंतरी सारं काही सुरळीत सुरु असताना त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा मधला काळ त्यांच्यासाठी प्रचंड कठीण गेला होता. डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या सल्ल्यामुळे त्यांचा कर्करोग आणखीनच बळावला होता. एका मुलाखतीमध्ये त्यांनी कर्करोग होण्यापासून ते कर्करोगावर मात करेपर्यंतच्या प्रवासाविषयी भाष्य केलं होते. त्यांच्या कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे.
आपल्या आजाराविषयी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होती की माझ्या लग्नाला २५ वर्ष झाली. मी एकदम फिट होतो आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलिया-न्युझिलंडला फिरायला गेलो होतो.पण,तिकडून आल्यानंतर काही दिवसांनंतर मला काही खाण्याची इच्छाच होईना. सतत मळमळल्यासारखं व्हायचं. काहीतरी गडबड झाली होती. त्यावर माझ्या भावाने मला काही औषधं सुद्धा दिली. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी मला अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगितली. त्यावेळी डॉक्टरांच्या डोळ्यात मला भिती दिसत होती. मला तेव्हाच कळलं काहीतरी गडबड आहे. त्यानंतर माझ्या यकृतामध्ये ५ सेंटीमीटर लांबीची कर्करोगाची गाठ असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यावर फक्त मी ठीक होणार की नाही हा एकच प्रश्न विचारला. डॉक्टरांनी हो. तू ठीक होशील असं उत्तर दिलं”, असं अतुल परचुरे म्हणाले.
पुढे ते सांगतात, “उपचार सुरु झाले पण त्याचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला. चुकीचा आजार जडल्याने माझी प्रकृती आणखीनच खालावली. सुरुवातीलाच हा आजार न दिसल्यामुळे माझ्या स्वादुपिंडावर परिणाम झाला. चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. मला नीट चालताही येत नव्हतं. मी बोलत असताना स्तब्ध व्हायचो. या अशा परिस्थिती डॉक्टरांनी मला दीड महिना वाट पाहायला सांगितली. त्यांनी सांगितलं जर सर्जरी केली तर वर्षानुवर्ष कावीळ होईल आणि माझ्या यकृतामध्ये पाणी भरेल किंवा मी फार दिवस जगणार नाही. त्यानंतर मी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार केले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अतुल परचुरे यांनी पुन्हा एकदा रंगमंचावर दमदार कमबॅक केले होते. ‘खरं खरं सांग’ या नाटकात ते झळकले. इतकंच नाही तर या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी विदेशदौरा देखील केला होता.
अतुल परचुरे यांनी आम्ही सातपुते, अलीबाबा आणि चाळीशीतले चोर, कंडीशन्स अप्लाय, कम ऑन यार, तुझ्याविन मर जावान, जिंदगी विराटस ,आधारवड, कलयुग. ऑल द बेस्ट : फन बिगिनर्स आदी नाटक आणि चित्रपटात काम केले होते. तसेच अनेक जाहीरातीत देखील त्यांनी काम केले होते.