आभाळमाया, वादळवाट यांसारख्या मालिकांच्या शीर्षकगीतांना आकार देणारे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. मंगेश कुलकर्णी यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. अनेक वर्षांनंतरही मंगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली मालिकांची शीर्षकगीतं ही अजरामर आहेत. मंगेश कुलकर्णी यांच्या शब्दांची किमया शाहरुखानच्या येस बॉस या सिनेमातही पाहायला मिळाली. या सिनेमात मंगेश कुलकर्णी यांनी पटकथालेखनाची जबाबदारी सांभाळली होती.
मंगेश कुलकर्णी यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मंगेश कुलकर्णी यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमधलही गाणी लिहिली आहेत. प्रहार, आवारा पागल दिवाना, मुस्तफा , येस बॉस यांसारख्या हिंदी सिनेमांचं त्यांनी पटकथालेखक म्हणून जबाबदारी स्वीकारली. मंगेश कुलकर्णी हे मुंबई पवईत वास्तव्यास होते. पण मागील अनेक दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव ते त्यांच्या बहिणीकडे भाईंदरला होते. शनिवार दुपारी साडे बाराच्या सुमारास मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं. मंगेश कुलकर्णी यांच्या शब्दांची जादू आजही कायम आहे. पण हा जादूगार आता काळाच्या पडद्याआड गेल्याने मालिकाविश्वातूनही शोक व्यक्त केला जातोय.
मंगेश कुलकर्णी यांच्या जाण्याने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी मंगेश कुलकर्णी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. मंगेश कुलकर्णी यांनी गीतकार त्याचप्रमाणे पटकथालेखक म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं.