पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप केला आहे. तर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माझा याप्रकरणाशी कोणताही संबंध नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले होते. आता याप्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे.

गाडीचा मालक काय म्हणाला ?

पुण्यात खेड-शिवापूर परिसरात सोमवारी रात्री एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ज्या गाडीतून ५ कोटींची रोख रक्कम सापडली ती गाडी अमोल नलावडे या व्यक्तीची असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता याप्रकरणी अमोल नलावडे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे. याप्रकरणी माझी काहीही चूक नाही, असे अमोल नलावडे यांनी म्हटले आहे.

पुण्यात खेड-शिवापूर परिसरात पाच कोटी रुपये सापडलेली ती गाडी उद्योगपती अमोल नलावडे यांच्या नावावर असल्याचे सांगितले जात होतं. मात्र आता याबद्दल अमोल नलावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “पाच कोटी रुपये सापडलेली ती गाडी मी काही महिन्यांपूर्वीच मी बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यामुळे या प्रकरणाचा आणि माझा काहीही संबंध नाही. मला पोलीस स्टेशन किंवा इतर कोणाचाही अजून तरी फोन आलेला नाही”, असे अमोल नलावडे यांनी म्हटले. “माझी काही चूक नाही. मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे. गाडी विकल्यानंतर मी त्या गाडीचे ऑनलाईन पैसे घेतले. त्यामुळे मला काही अडचण येईल असे वाटत नाही. आम्ही काही वर्षांपूर्वी शेकापचे काम करायचो. मात्र आता कोणत्याही पक्षाशी आमचा संबंध नाही”, असेही गाडीचे अगोदरचे मालक असंही त्यांनी म्हटले आहे.

नेमकं काय घडलंय?

पुणे सातारा रस्त्याने एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास एक संशयित वाहन टोल नाक्यावर आले. यावेळी या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात पोलिसांना रोख रक्कम असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी संबंधित वाहनातील रोख रक्कम जप्त केली. तसेच या वाहनातील चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गाडीत पोलिसांना जवळपास 5 कोटींची रोख रक्कम मिळाल्याचे बोललं जात आहे.

सध्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सुरु आहे. सध्या खेड-शिवापूर पोलीस चौकीत वरिष्ठ पोलीस आणि महसूल अधिकारी दाखल झाले आहेत. या वाहनातील रक्कमेची शहानिशा करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान या वाहनात नक्की किती रक्कम होती हे अजून स्पष्ट झालेले नाही; मात्र या वाहनात मोठी रोख रक्कम असल्याचे बोलले जात आहे. ही रक्कम कोणाची? कुठे नेण्यात येणार होती? इत्यादीची पडताळणी राजगड पोलिसांकडून सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *