Breaking News

शिवडीतून अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी ; सुधीर साळवी नाराज , तत्काळ बैठकीतून निघून गेले…

मुंबईतील लालबाग शिवडी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार अजय चौधरी आणि विभाग संघटक सुधीर साळवी यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. हा तिढा मातोश्रीपर्यंत पोहोचला होता. मातोश्री येथे झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाला आहे. निर्णयानंतर अजय चौधरी यांना शिवडी विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून एबी फॉर्म देण्यात आला. या निर्णयामुळे सुधीर साळवी हे कमालीचे नाराज झाले आहेत. चौधरी यांना उमेदवारी घोषणा होताच साळवी तत्काळ बैठकीतून निघून गेले.

ठाकरे गटाकडून बुधवारी ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र शिवडीचा सस्पेन्स कायम ठेवला होता. येथून सुधीर साळवी की अजय चौधरी कोणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता ताणली होती. अखेर शिवडीचा तिढा सुटला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवडीचा उमेदवार जाहीर केला आहे. विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आलं असून सुधीर साळवी यांना डावलण्यात आले आहे.

शिवसेनेत फूट पडली त्यावेळी आमदार म्हणून अजय चौधरी हे ठाकरेंसोबतच राहिले.त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठेवरुन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण लालबाग-परळसारख्या भागात सुधीर साळवी यांच्या उमेदवारीची उत्सुकता होती. मात्र आता अजय चौधरींच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. असं असलं तरीही मी पक्षासोबत एकनिष्ठ राहणार असल्याची ठाम भूमिका सुधीर साळवी यांनी घेतली आहे.