राज्यात दिवाळीनंतर आता प्रचास सभा जोर धरू लागल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगच्या ‘कमरिया लॉलीपॉप लागेलू’ या लोकप्रिय गाण्यावरून मुंबईत राजकीय वातावरण तापलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘कमरिया लॉलीपॉप लागेलू’ या गाण्यावर डान्स केला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी ही डान्स होत असल्याचा दावा व्हायरल व्हिडिओमध्ये केला गेला आहे.
व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार, एकनाथ शिंदे पोहोचण्याआधी लोकांची गर्दी जमवण्यासाठी मंचावर भोजपुरी गाण्यावर अश्लिल डान्स केला गेला. शिंदेंच्या शिवसेनेकडून कुर्ला येथील विधानसभा जागेसाठी मंगेश कुडाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मंगेश कुडाळकर यांच्या सभेचे हे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी ३ नोव्हेंबर रोजी मंगेश कुडाळकर यांच्या समर्थनार्थ प्रचार केला होता. मुख्यमंत्री शिंदेंनी कुर्ला येथील सभेनंतर फेसबुशवर शेअर केलं होतं, की कुर्ला विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी प्रचंड बहुमताने मंगेश कुडाळकर यांनी विजयी करण्याचं आवाहन केलं होतं. त्याआधी त्यांनी या विधानसभा क्षेत्रातील लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की माझ्यावर जे प्रेम आणि विश्वास लोकांनी दाखवला आहे, तीच माझी खरी ताकद आहे.
कोण आहेत मंगेश कुडाळकर?
मंगशे कुडाळकर शिवसेनेचे जुने नेते आहे. ते २०१४ मध्ये कुर्ला विधानसभा क्षेत्रातून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये ते दुसऱ्यांदा निवडून आले. आता पुन्हा ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिंदेंचे कुर्ल्यातील उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कुर्ल्यातून प्रवीण मोजकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आता कुडाळकर यांच्या सभेत मुख्यमंत्री येण्याआधी मंचावर भोजपुरी डान्स झाल्यानंतर ते विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.