शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘कुटुंबप्रमुखांचा वचननामा’ प्रसिद्ध केला. ज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसह महिलांना अर्थसाहाय्य देण्याच्या पंचसूत्रीतील आश्वासनांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर कोणत्याही धर्माच्या कारभारात सरकार अवाजवी, विनाकारण हस्तक्षेप करणार नाही असेही वचन देत सर्वधर्मीयांना दिलासा देण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वचननामा जाहीर करण्यात आला यावेळी पक्षाचे नेते सुभाष देसाई, आमदार अनिल परब उपस्थित होते.
या वचननाम्यात धारावीकरांचा तिथल्या तिथे पुनर्विकास करताना अदानी प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. बारसू रिफायनरी रद्द करण्याचे आश्वासन कोकणवासीयांना देण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचे मंदिर, पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवताना मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण अशा घोषणा या वचननाम्यातून देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीची पंचसूत्री असताना स्वतंत्र वचननामा कशासाठी? याबाबतची भूमिका ठाकरेंनी स्पष्ट केली. ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आघाडीमध्ये सामील असला तरी या पक्षाची एक स्वतंत्र वचनबद्धता आहे. आमच्या पक्षाने २०१२च्या निवडणुकीत वचननामा जाहीर केला होता आणि त्यातील आश्वासने देखील पक्षाने पूर्ण केली होती. त्यानुसार हा वचननामा जाहीर करण्यात आला आहे,’ ठाकरे यांनी नमूद केले.
राज्यातील कोळीवाडे आणि गावठाणे यांच्यावर सरकारची वक्र नजर असून या ठिकाणी सरकारला समूह पुनर्विकास करायचा आहे. पण हा डाव आम्ही हाणून पाडणार आहोत. धारावी बकाल करण्याचा सरकारचा डाव असून धारावीकरांना धारावी सोडायला लावली जात आहे. १ हजार एकर जमीन सरकार अदानीला देत आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या नागरी सुविधावर ताण पडणार असून तो प्रकल्प सरकार आल्यानंतर आम्ही रद्द करणार आहोत. धारावी येथे वित्तीय केंद्र उभे करणार आहे,’ असेही ठाकरे यांनी सांगितले.
राज्यातील कोळीवाडे आणि गावठाणे यांच्या सरकारची वक्र नजर आहे. त्यांना तिथे क्लस्टर करायचा आहे पण आमचे सरकार आल्यावर हे क्लस्टर प्रकल्प रद्द करू असा इशारा ठाकरेंनी दिला आहे. हा विषय धारावी पुरता मर्यादित नाही मुंबई बकाल करण्याचा त्यांचा डाव आहे ते आम्ही होऊ देणार नाही. धारावीच्या प्रकल्पामुळे मुंबईच्या नागरी सुविधावर ताण पडणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
वचननाम्यातील प्रमुख आश्वासने
- प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार
- महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला २०३५ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. पुढच्या ११ वर्षांत महाराष्ट्राचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास तसेच प्रगतिशील आणि पुरोगामी संस्कृतीचे दर्शन घडविणारी लेणी उभारणार
- शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार
- महिलांना मिळणारे सरकारी अर्थसाहाय्य वाढविणार