Breaking News

“लाडक्या बहिणी अन् शेतकऱ्यांसाठी १०० वेळा तुरुंगात जाईन” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांची चौकशी केली जाईल. तसेच दोषींना तुरुंगात पाठवले जाईल, असे महाविकास आघाडीतील नेते वारंवार बोलत आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही झाले तरी या योजना सुरूच ठेवणार, लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांसाठी १०० वेळा तुरुंगात जावे लागले तरी जाईल, असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली. एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आमच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांकडून अनेक आरोप केले जात आहे. सरकारकडे पैशाच नाही, सरकारने सगळी तिजोरी रिकामी केली, ही योजना काही महिन्यानंतर बंद होईल, असे ते बोलत होते. एवढेच नव्हेतर, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांची चौकशी करू आणि दोषी आढळल्यास त्यांना तुरुंगात टाकू, असेही विरोधक म्हणत आहेत. माझे विरोधकांना आव्हान आहे की, तुम्ही चौकशी करा. पण मी लाडक्या बहिणींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केल्या आहेत, त्या बंद करणार नाही. यासाठी मला १०० वेळा तुरुंगात जावे लागले तरी जाईन.’

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘एकीकडे विरोधक लाडक्या बहीण योजनेला विरोध करत आहेत आणि दुसरीकडे आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन देत आहेत. सरकारच्या योजना चोरून जनतेसमोर जायचे, ही देशातील पहिलीच घटना असेल. पंरतु, आमचे सरकार पैसे काढून घेणारे नाहीतर पैसे देणारे सरकार आहे’.

परभणी येथे पार पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सभेला माजी आमदार हरिभाऊ लहाने, आमदार मेघना बोर्डीकर उमेदवार, आनंद भरोसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *