Breaking News

संभाजीनगरात मतदान कार्ड घेऊन बोटाला शाई लावून १५०० रुपये वाटले! ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा धक्कादायक आरोप

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी (दि २०) तारखेला मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यानंतर छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान, संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील इंदिरा नगर परिसरात काही नागरीकांकडून मतदान कार्ड घेऊन त्यांच्या बोटाला शाई लावून १५०० रुपये वाटणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आलं आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट केली असून या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजी नगरातील या घटनेप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी ट्विट केले आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण १८ लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे २ कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. ‘कर्तव्यदक्ष’ जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा व प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. तब्बल पाच हजार मतदानकार्ड जमा केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अंबादास दानवे यांच्या आरोपांवर शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी प्रतिक्रिया दिली असून पराभव जवळ दिसू लागल्याने पायाखालची वाळू सरकल्याने असे बिनबूडाचे आरोप विरोधक करत असल्याचे शिरसाट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्या होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. आजच निवडणूक कर्मचारी मतदान यंत्र घेऊन मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत. मतदान केंद्राच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी शीघ्र कृती दलाचे पथके देखील तैनात करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *