यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. रात्री उशिरा आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ६५.११ टक्के मतदान झाले. अनेक एक्झिट पोल आले असून, बहुतांश जणांनी महायुतीचे सरकार येईल, असा अंदाज वर्तवला आहे. यानंतर आता महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. निकालानंतर काय जुळवाजुळव करता येऊ शकते, यावर चर्चा सुरू झाल्यात आहेत. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय बांगर यांनी आम्हीच गुलाल उधळणार असा दावा केला आहे.
संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मतदारसंघातील माझे सर्व कार्यकर्ते अपडेट घेऊन येत आहेत. २५ हजार मतांच्या फरकाने माझा विजय होईल. विरोधकांना दुसरा काही धंदा नव्हता. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका संतोष बांगर यांनी विरोधकांवर केली. मला माझ्या मायबाप जनतेवर विश्वास आहे. २३ तारखेला धनुष्यबाणाचा गुलाल आम्हीच उधळणार आहे यात कुठलाही दुमत नाही, असा विश्वास संतोष बांगर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच होतील. महाराष्ट्राचे भले करायचे असेल तर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विकास सुरु आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एवढा विकास कधी झाला नाही तो विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये अडीच वर्षात झाला. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पाच वर्षासाठी महायुतीचे सरकार येणार असल्याचे संतोष बांगर यांनी सांगितले.
दरम्यान, २३ तारखेला निकाल लागल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि चांगला निर्णय करू. मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढली आहे, त्यानुसार थोडासा मला प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर दिसतो. लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणे हा त्याचा अर्थ होतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.