Breaking News

‘पुष्पा २’ सिनेमाचे तिकिट न मिळाल्याने सांगलीमध्ये चित्रपटगृहावर दगडफेक

सध्या सगळीकडे ‘पुष्पा २ द रुल’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई करणाऱ्या या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २ द रुल’ हा सिनेमा येत्या काळात बक्कळ कमाई करणार असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, सांगली येथील चाहत्यांनी ‘पुष्पा २ द रुल’ सिनेमाचा तिकिट न मिळाल्याने तिकिट खिडकीवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

नेमकं काय झालं होतं?

देशभरात ‘पुष्पा २ द रुल’ सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील जात येथे देखील अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली. सिनेमा हाऊसफूल झाल्यामुळे काही चाहत्यांना तिकिट मिळाले नाही. या चाहत्यांनी चित्रपटगृहाच्या तिकिट खिडकीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळ चित्रपटगृहाबाहेर गोंधळ उडाला होता. तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीसांनी ही गर्दी पांगवली.

यापूर्वी झाली होती चेंगराचेंगरी

बुधवारी रात्री हैदराबादमधील आरटीसी चौकातील संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी पुष्पा २ हा सिनेमा पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. या गर्दीमुळे थोड्या वेळातच चेंगराचेंगरी झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे एक महिला आणि तिचे मूल कोसळले. मातृभूमीने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी थिएटरजवळ चेंगराचेंगरी परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये रेवती नावाच्या ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिचे मूल गंभीर जखमी झाले. कडक सुरक्षा आणि पोलिस संरक्षणासह अल्लू अर्जुनने हजेरी लावली होती. तरी देखील ही घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *