या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये ‘वन यर ऑफ अॅनिमल’ साजरे होणार आहे. यावेळी ‘अॅनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा उपस्थित असतील. या विशेष भागात संदीप रेड्डी वांगा अतिथी म्हणून येतील आणि अगदी सामान्य परिस्थितीत सुरुवात करून एक बहु-चर्चित दिग्दर्शक बनण्यापर्यंतच्या आपल्या प्रेरणादायक प्रवासाविषयी सांगतील. याच भागात ‘तुझे कितना चाहने लगे’ हे गाणे सादर करून स्पर्धक रितिका राज सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसेल. तिच्या परफॉर्मन्सचे कौतुक करताना संदीप म्हणाला, “हे गाणे गायिकेच्या आवाजात कसे वाटेल याचा मी कधीच विचार केला नव्हता, पण मला हे आवडले!”
रितिकाने संदीपशी मनमोकळ्या गप्पा मारताना त्याच्या प्रारंभिक जीवनाविषयी आणि दिग्दर्शक बनण्याच्या त्याच्या प्रवासाविषयी विचारले. तिने संदीपला विचारले, “आम्ही असे ऐकले आहे की, तुझ्या कुटुंबाचा तुला चांगला पाठिंबा होता. तुझ्या प्रवासात तुला त्यांची कशी मदत झाली?” संदीपने एक हृदयस्पर्शी कहाणी सांगितली. तो म्हणाला, “माझ्या कुटुंबाचा आधार फार महत्त्वाचा होता. मी एकदा माझ्या आईला असे ठासून सांगितले होते की, मी सिडनीला राहून फिल्म स्कूलमध्ये शिकत असताना मॅकडोनाल्ड आणि सबवेमध्ये काम करून जे 2 लाख रु. कमावले होते, ते पूर्ण खर्च करण्याअगोदर मी दिग्दर्शक बनून दाखवीन. अर्थात मला 6-7 वर्षं लागली, पण आईच्या आधाराशिवाय ‘अर्जुन रेड्डी’ जसा बनला आहे, तसा बनणे शक्य नव्हते. त्या चित्रपटाची संकल्पना घेऊन मी अनेक निर्मात्यांना भेटलो होतो. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी आम्ही स्वतःच चित्रपट निर्मिती करायचे ठरवले. त्यावेळी माझ्या कुटुंबाची खूप मोठी साथ लाभली.”
सुरुवातीला असलेल्या कारकिर्दीच्या अपेक्षा आणि चित्रपटनिर्मितीकडे आपण कसे वळलो हे देखील संदीपने सांगितले. रितिकाने त्याला विचारले, “मी ऐकले आहे की, आधी तुम्हाला फिजिओथेरपिस्ट व्हायचे होते. मग तुम्ही दिग्दर्शक कसे झालात? तुम्ही तशी कल्पना केली होती?” त्यावर संदीप उत्तरला, “1990 च्या दशकात आणि अगदी 2000 च्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये दक्षिण भारतीय कुटुंबातील मुले इंजिनियर बनण्याची स्वप्ने बघत किंवा मग डॉक्टर होण्याची. मला MBBS करण्याइतके मार्क्स मिळाले नाहीत. म्हणून मी फिजिओथेरपीचे क्षेत्र निवडले. पण, एक वर्षानंतर माझ्या लक्षात आले की या क्षेत्रात काम करण्याची आणि पैसे कमावण्याची माझी इच्छा नाही. लहानपणापासून मला फोटोग्राफीत रुची होती. त्यातूनच कथा मांडण्याचे वेड लागले. मी सिडनीला तेथील फिल्म स्कूलमध्ये शिकायला गेलो. तेथून परतलो आणि त्यानंतर 6-7 वर्षांनी दिग्दर्शक झालो.”
या संभाषणात सामील होत श्रेया घोषालने संदीपला विचारले की, फिल्म स्कूलमध्ये जाण्याचा निर्णय त्यानेच विचार करून घेतला होता की कुटुंबाची त्यात काही भूमिका होती? त्यावर संदीप म्हणाला, “माझ्या कुटुंबाने आणि विशेषतः माझ्या आईने मला नेहमीच साथ दिली. तिने मला फिल्म स्कूलची फी भरण्यात आणि अर्जुन रेड्डीची निर्मित करण्यात देखील मदत केली. माझ्या चित्रपटांमध्ये आईच्या भूमिकेला मी फारसे महत्त्व देत नाही, असा माझ्यावर आरोप करण्यात येतो. पण मला हे समजले आहे की, प्रत्यक्ष जीवनात मात्र माझे माझ्या आईशी घट्ट नाते आहे. आम्हाला त्या नात्याबाबत कोणत्याही तक्रारी नसल्यामुळे त्यामध्ये नाट्य नाही किंवा संतापही नाही, की त्याबद्दल काही लिहावेसे वाटावे. मी जर कधी आई आणि मुलाची कहाणी बनवलीच, तर ती नक्कीच सकारात्मक असेल. त्यात काहीच डार्क नसेल, सगळं चांगलंच असेल.”
इंडियन आयडॉल 15 चा हा एपिसोड चुकवू नका, या वीकएंडला रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!