Breaking News

अरे देवा ….. पुणेकरांना 9 महिन्यात चावले 18 हजार भटके कुत्रे

पुण्यामधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. भटक्या कुत्र्यांची भटकंती सर्वसामान्या नागरिकांना व पुणेकरांना त्रासदायक होत असल्याचं दिसून येत आहे. कारण, पुणे शहरात गेल्या 9 महिन्यांमध्ये 18 हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. गेल्यावर्षी 2023 मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 14 हजार 73 घटना घडल्या होत्या. त्यावरून शहरात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

पुण्यात गेल्या ९ महिन्यात १८ हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असून दर महिन्यात दोन हजार नागरिकांना चावा घेतल्याचं हे प्रमाण आकडेवारीतून समोर आलं आहे. त्यामुळे, पुण्यातून पादचारी मार्गाने किंवा गल्ली परिसरातून जाताना नागरिकांनी, पादचाऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचं असल्याचं लक्षात येईल. विशेष म्हणजे पुणे महापालिका या घटनांची गंभीर दखल कधी घेणार ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर, पुणे शहरात गेल्या 9 महिन्यांमध्ये 18 हजाराहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. ही संख्या इतकी मोठी असली तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करण्यात येत असल्याचा दावा पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.

कुत्र्यांनी चावा घेतलेली आकडेवारी (2024)

महिना : चावा घेतलेल्यांची संख्या
जानेवारी : 1973
फेब्रुवारी : 2093
मार्च : 1961
एप्रिल : 1920
मे : 2839
जून : 2199
जुलै : 2012
ऑगस्ट : 1937
सप्टेंबर : 2026
गेल्या 9 महिन्यातील ही आकडेवारी असून या सर्वच महिन्यांतील बाधित रुग्णांची संख्या 18 हजारांहून अधिक आहे.

यंदाच्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 18 हजार 960 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या आकडेवारीनुसार शहरात दर महिन्याला कुत्रे चावीच्या दोन हजार घटना घडत असल्याचे दिसून आलं. गेल्या वर्षी 2023 मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 14 हजार 73 घटना घडल्या होत्या. भटके कुत्रे चावल्याची तक्रार आल्यानंतर संबंधित कुत्र्याला रेबीज आहे का याची तपासणी केली जीते. रेबीज नसल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला पुन्हा मूळ वसतिस्थानात सोडले जाते. दर महिन्याला सरासरी साडेचार ते पाच हजार कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते.

कुत्रा चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास रेबीज होण्याची शक्यता असते. शहरातील कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. महापालिका आरोग्य विभागाकडे शहरातील श्वानांची ऑनलाइन पद्दतीने नोंदणी केली जाते, अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ.निना बोराडे यांनी दिली. पण दुसऱ्या बाजूला या घटनांना पुणेकर वैतागले आहेत. त्यांनी पालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *