भाजपचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले आहेत. राहुल गांधी यांनी धक्का दिल्यामुळे मी जखमी झालो, असं भाजप खासदार सारंगी यांचा दावा आहे. “मी शिड्यांवर उभा होतो. राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला. तो खासदार माझ्या अंगावर पडला. त्यामुळे मी पडलो आणि जखमी झालो” असा दावा प्रताप सारंगी यांनी केला.
प्रताप सारंगी यांच्या आरोपावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले, “हो, मी केलय, ठीक आहे. धक्का-बुक्कीने काही होत नाही. मला संसदेच्या आता जायचं होतं. संसदेत जाणं माझा अधिकार आहे. मला थांबवण्याचा प्रयत्न झाला. मला संसदेत आत जाण्यापासून रोखण्यात आलं. भाजप खासदार धक्का बुक्की करत होते”
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी म्हणाले की, “हे संसदेच प्रवेशद्वार आहे. भाजपचे खासदार मला ढकलत होते. धमकावत होते. भाजप खासदारांनी प्रवेशद्वार रोखून धरलं होतं. ते मला सतत ढकलत होते, धमकावत होते”
अमित शाह यांच्याविरोधात आज आंदोलन
अमित शाह यांच्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप आहे. या संबंधी आज इंडिया आघाडी प्रोटेस्ट मार्च सुरु आहे. राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधान केलं. त्या वक्तव्याविरोधात अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी इंडिया आघाडीने केली आहे. त्यासाठी हा प्रोटेस्ट मार्च सुरु आहे. त्यांनी माफी मागावी अशी सुद्धा मागणी आहे. संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेपासून मकर द्वारपर्यंत हा प्रोटेस्ट मार्च आहे.
काँग्रेसने काय म्हटलं?
इंडिया आघाडीचे खासदार निळे कपडे घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेपासून मकर द्वारपर्यंत चालत जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय असा काँग्रेसचा आरोप आहे. त्यांचा गुन्हा अक्षम्य आहे, सगळं तंत्र त्यांना वाचवण्यासाठी कामाला लागलं आहे असं काँग्रेसने म्हटलं.