कल्याणमधील योगीधाम परिसरामध्ये असणाऱ्या अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू वस्तीमध्ये धूप लावण्याच्या वादातून मराठी माणसाला अखिलेश शुक्ला यानं 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलवून मारहाण करायला लावली आणि याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. तिथं अखिलेश शुक्लावर आता कारवाईचा बडगा उगारला जात असतानाच शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून ‘सामना’ मुखपत्रातून तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे. ठाकरी शैलीमध्ये या संपूर्ण कृत्याचा समाचार घेत अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवरही निशाणार साधण्यात आला आहे. मिंध्यांनो, पेढे वाटा! अशा मथळ्याअंतर्गत सामनातील अग्रलेख लिहिण्यात आला असून, घडल्या कृत्यावर शिवसेना ठाकरे पक्षानं आपली कठोर भूमिका मांडत सक्तीच्या कारवाईची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयावर सामनातून टीका करत हे खरं बहुमत नाही अशा शब्दात ही नारजी व्यक्त करण्यात आली आहे. बहुमत प्रामाणिक असतं तर मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ परिसरात मराठी माणसांवर निघृण हल्ले झालेच नसते असं म्हणत कल्याण घटनेवर उजेट टाकण्यात आला.
‘कल्याणच्या उच्चभ्रू वस्तीत कोणी अखिलेश शुक्ला नामक उपऱ्याने गुंड टोळ्यांच्या मदतीने मराठी कुटुंबावर हल्ला केला. मराठी माणसे मच्छी-मटण खातात, ती घाणेरडी आहेत या सबबीखाली शुक्ला व त्याचे गुंड कल्याण परिसरात झुंडशाही करतात आणि फडणवीसांचे पोलीस त्या शुक्लासमोर नांगी टाकतात. हा जो कोणी शुक्ला आहे, तो महाराष्ट्राच्या मंत्रालयात काम करतो व मंत्रालयाचा अधिकार वापरून पोलिसांवर दबाव आणतो. त्यामुळे रक्तबंबाळ मराठी कुटुंबाची फिर्याद घ्यायला फडणवीसांचे पोलीस तयार नाहीत. “मला हात लावाल तर याद राखा, मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला फोन येईल,” अशी धमकी हा शुक्ला देतो. म्हणजे मराठी माणसांवरील हल्ल्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे समर्थन आहे असे समजायचे काय? मराठी माणूस माझ्यासमोर झाडू मारतात, अशी गुर्मीची मस्तवाल भाषा करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे. त्यास मोदी-शहा-फडणवीस यांचे महाराष्ट्र कमजोर करण्याचे धोरण कारणीभूत आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठीच या त्रिकुटाने शिवसेना फोडली. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली व मराठी माणसाला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी शिवसेना लढे देत राहिली. त्या लढवय्या वृत्तीनेच मुंबई व मराठी माणूस टिकून राहिला, पण मोदी- शहांना मुंबई अदानीच्या घशात घालायची आहे व शिवसेना आहे तोपर्यंत हा डाव यशस्वी होणार नाही, म्हणून शिवसेना तोडण्याचे कारस्थान तडीस नेले. त्यामुळे मुंबईतील सर्व संपत्ती आता अदानी व इतर उपयऱ्यांना सहज हडप करता येईल. फडणवीसांचे सरकार हा काही लोकमताचा कौल नाही’ असं या अग्रलेखात लिहिलं गेलं.
कल्याणचा हा शुक्ला कोण? तो कोणाच्या जीवावर मराठी माणसांना धमक्या देतो? मुख्यमंत्री कार्यालयातील त्याचा दलाल कोण? असे प्रश्न उपस्थित करत फडणवीस आणि शिंदेंना हे सरकार तुमचं असलं तरीही हे राज्य ‘मऱ्हाटी’ आहे या शब्दांत सामनातून खडसावण्यात आलं. शुक्ला मंत्रालयाचा नोकर असल्यास त्याच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत ‘मिंध्यांनो पेढे वाटा पेढे वाटा… महाराष्ट्र खरंच कमजोर झालाय!’ असा बोचरा टोलाही लगावण्यात आला.