Breaking News

ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला; झेलेन्स्की म्हणाले, “यापेक्षा अमानवी काय असेल?”

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान बुधवारी रशियाने युक्रेनवर ७० क्षेपणास्त्रे आणि १०० हून अधिक ड्रोन्सनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाने त्यांच्या ऊर्जेसंबधी पायाभूत सुविधांवर हल्ला केल्याची माहिती दिली आहे. ऐन ख्रिसमसच्या दिवशी हा हल्ला करण्यात आलेला हा हल्ला अमानवी असल्याचे झेलेन्स्की म्हणाले आहेत. दरम्यान या हल्ल्यात युद्धग्रस्त युक्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांनी जगभरात उत्सव साजरा केला जात असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी जाणीवपूर्वक युक्रेनच्या उर्जेसंबंधी पायाभूत सुविधांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

“प्रत्येक मोठ्या रशियन हल्ल्याच्या तयारीसाठी वेळ लागतो. हा कधीच उत्स्फुर्तपणे घेतलेला निर्णय नसतो. हा मुद्दाम घेतलेला निर्णय आहे. यामध्ये फक्त लक्ष्यच नाही तर वेळ आणि तारीख देखील मुद्दाम निवडण्यात आली आहे. आज, पुतिन यांनी जाणूनबुजून हल्ल्यासाठी ख्रिसमसची निवड केली. यापेक्षा अमानवी काय असू शकते?” असे झेलेन्स्की यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

“७० हून अधिक क्षेपणास्त्रे, ज्यामध्ये बॅलेस्टीक क्षेपणास्त्रे आणि शंभरहून अधिक ड्रोन यांचा समावेश आहे. लक्ष्य होते आमची ऊर्जा प्रणाली”, असेही झेलेन्स्की म्हणाले आहेत. ब्लॅक सी येथून रशियाने कालिब्र क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्यानंतर युक्रेनमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजत होते.

गेल्या तीन वर्षांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे. सध्या रशियाकडून हवाई हल्ले वाढवले आहेत तर पूर्वेकडील सैन्य पुढे ढकलले जात आहे. यादरम्यान बुधवारी पहाटे खार्किव शहरावर मोठ्या प्रणाणात क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

फेब्रुवारी २०२२ पासून रशियन सैन्याकडून वारंवार युक्रेनच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात आहे. ज्यामुळे युक्रेनमध्ये वारंवार वीज खंडित होते, ज्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नोव्हेंबरमध्ये युक्रेनच्या पॉवर ग्रिडवर सुमारे २०० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करण्यात आले. युक्रेन आपल्या पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी मित्र राष्ट्रांकडे प्रगत हवाई संरक्षण प्रणालीची मागणी करत आहे. काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या सैन्याला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या वापरास अमेरिकेने परवानगी दिली आहे. यानंतर रशियाकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *