लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनीचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी केलेले “कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम केले पाहिजे” हे विधान अत्यंत असंवेदनशील, कर्मचारी विरोधी व भारतीय कामगार कायद्याच्या पूर्णतः विरोधात आहे.
कायद्यानुसार भारतात आठवड्याला कामाचे ठरलेले तास 48 आहेत. या मर्यादेपेक्षा अधिक तास काम करणे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा भंग व त्यांच्यावर अन्याय आहे. सुब्रह्मण्यन यांचे “रविवारी कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे न बसता काम करावे” हे विधान कौटुंबिक जीवनाचा आणि वैयक्तिक स्वास्थ्याचा अपमान करणारे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही या विधानाचा तीव्र निषेध करतो. कर्मचाऱ्यांचा सन्मान राखणे, त्यांना योग्य विश्रांती देणे व त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपणे हे प्रत्येक कंपनीचे प्राथमिक कर्तव्य आहे.
सुब्रह्मण्यन यांच्या विधानावर आधारित आम्ही कंपनीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी व भारतीय कामगार कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करतो.
कंपनीने या विधानावर सार्वजनिक माफी मागावी आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित धोरणे नव्याने राबवावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कामगारांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.